कोकण विभागताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

हातामध्ये रुद्राक्ष बांधताहेत, बाळासाहेबांच्या नखाची सर सुद्धा येणार नाही

रत्नागिरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतादानासाठी आता अवघे 24 तास उरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मात्र त्यापूर्वी राज्यभरात प्रचाराचं रणकंदन माजलं. यामध्ये अनेकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मनसेचे अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या राज ठाकरे यांनी काल ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंवर आरोप करत घणाघाती हल्ला केला. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गद्दार म्हटलं. एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर अवघ्या काही वेळातच आणखी एका नेत्याने उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत. हातामध्ये रुद्राक्ष बांधताहेत, जणू मी काय बाळासाहेब ठाकरेच आहे. पण बाळासाहेबांची सर त्यांना येणार नाही अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना फोडण्याचं पाप केलं असा आरोपही कदम यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडेल
खेड रत्नागिरीमध्ये बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. शिवसेना ठाकरे गटाच्या या प्रमुख नेत्यावर त्यांनी कडाडून टीका केली. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडेल. कालपर्यंत त्यांनी वाघाचं चामडं घातलंय असा अविर्भाव होता ते आता उघड पडलंय अशी टीका कदम यांनी केली. या निवडणुकीत महायुतीच्या ( शिवसेना भाजप राष्ट्रवादी) किमाना 170 जागा येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंवर एफआयआर का दाखल होत नाही ?
उद्धव ठाकरे यांचा तोल इतका खाली गेला आहे की ते मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना काहीही बोलतात. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत एक वक्तव्य केलं होतं,मी असतो तर कानफडीत मारली असती. त्यांना जेवणावरून उचलून आत मध्ये टाकला होतं, मग उद्धव ठाकरेंवर एफ आय आर दाखल का होत नाही ? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारायचा प्रयत्न करत आहेत. हातामध्ये रुद्राक्ष बांधताहेत, जणू काय मी बाळासाहेब ठाकरे आहे. पण बाळासाहेबांच्या नखाची सर सुद्धा तुला येणार नाही असा टोला कदम यांनी हाणला. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडण्याचा पाप केलंय. उतारवयात मनोहर जोशींना स्टेजवरून भर जाहीर सभेत उतरवायला भाग पाडलं. माझ्या बाबतीतही त्यांनी तसाच प्लॅन केला होता पण मला एकनाथ शिंदेंनी वाचवलं, असं म्हणत कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button