तक्रारींच्या सोडवणुकीची काटेकोर तपासणी

पुणे : नागरिकांकडून त्यांच्या परिसरासह शहरातील अन्य कामांबाबत महापालिकेकडे केलेल्या तक्रारींना योग्य तो प्रतिसाद मिळत नाही, अशा अनेक तक्रारी येत आहेत.त्यामुळे आता संबंधित विभागाकडून तक्रारीचे निवारण झाले की नाही, याची विचारपूस महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे करणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.
मूलभूत सोयीसुविधा, त्याचबरोबर महापालिकेच्या कामासंदर्भातील तक्रारी पीएमसी केअरच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाकडे करण्यात येतात. त्यामध्ये बांधकाम, आरोग्य, अतिक्रमण, साफसफाई, घनकचरा अशा विविध तक्रारी असतात.महापालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर रस्त्यावर पडलेले खड्डे, कचरा, अपुरा पाणीपुरवठा, बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी चुकीची कामे यांसह अनेक तक्रारी महापालिकेच्या व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकवर येतात.
हेही वाचा – महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बारामती तालुक्यात ‘शक्ती अभियान’ राबविणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
तक्ररांची दखल घेऊन तक्रार क्रमांक देखील संबंधित ग्राहकाला अथवा नागरिकाला दिला जातो. ज्या- त्या विभागाची तक्रार संबंधित विभागाला पाठवली जाते. त्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाते.मात्र, महापालिकेचे अधिकारी तक्रारीचे निवारण न करताच परस्पर ती तक्रार सोडविल्याचे सांगत असल्याचा अनुभव नागरिकांना वारंवार येत आहे.
याशिवाय महापालिकेत दाखल झालेली समाविष्ट गावे, वाढणारी लोकसंख्या, बांधकामांमुळे प्रशासनाला अपुर्या मनुष्यबळावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.शहरातील समस्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना निदर्शनास आल्या नाहीत म्हणून त्या तशाच राहू नयेत. यासाठी नागरिकांनी समस्या निदर्शनास आल्यास त्याबाबत महापालिकेकडे तक्रार करावी आणि महापालिकेकडून त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जातो.
महापालिकेने फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपवरून नागरिकांच्या तक्रारी घेण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये ट्विटर, फेसबुकला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.ऑनलाइन तक्रारी परस्पर बंद होतात. अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.
नागरिकांची तक्रार सोडवणे, तसेच त्यांचे समाधान होणे महत्त्वाचे आहे. म्हणून महापालिकेच्या कॉल सेंटरकडून फिडबॅक घेतला जाणार आहे, तसेच संबंधित विभागाला रेटिंग दिले जाणार आहे. तक्रारी सोडविल्यानंतरही समाधान होईपर्यंत संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला जाईल.
– पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका.





