तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे काम सुरु करा; महामार्ग कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी मंगळवारी (दि. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यासंदर्भात निवेदन दिले.
५३ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी हा मुंबई-पुणे आणि पुणे संभाजीनगर या महामार्गासह औद्योगिक परिसराला जोडणारा रस्ता आहे. तसेच पुणे शहराला बाह्यवळण म्हणून उपयुक्त ठरणारा रस्ता आहे. सदर महामार्ग राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (एमएसआईडीसी) मार्फत विकसित केला जाणार आहे.
हेही वाचा : ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले..
याबाबतचा प्रस्ताव एमएसआईडीसी मार्फत राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तरी सदर प्रस्तावाचा आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत समावेश करुन त्यास मंजुरी द्यावी आणि सदर रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे, कृती समितीचे सचिव अमित प्रभावळकर, उपाध्यक्ष दिलीप डोळस, प्रमोद देशक, गणेश बोरुडे, राजगुरुनगर शिवसेना शहरप्रमुख संतोष राक्षे, सुधाकर शेळके हे याप्रसंगी उपस्थित होते.