उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात शरद पवार जाणार नाहीत, कारण सांगत म्हणाले; “मी…”

Sharad Pawar : शिवसेना आणि मनसेचा एकत्रित विजयी मेळावा ५ जुलैला होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील इतर पक्षही सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवलेली आहे. हा मेळावा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो आहे. दरम्यान या विजयी मेळाव्यात आपण जाणार नाही असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने याविरोधात पुकारण्यात आलेला मोर्चा रद्द झाला. मोर्चा रद्द झाल्यानंतर आता हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानिमित्त विजयी मेळावा घेण्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आले. याबाबत शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दूरध्वनी करून या मेळाव्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. हा मेळावा होणार असला तरी त्यात कोणतेही पक्षीय लेबल लावाचे नाही. हा मराठी माणसाचा विजय आहे, त्यामुळे मेळावा मराठी माणसाचा आहे. मराठी भाषा या विषयावर कोणकडूनही तडजोड हाेता कामा नये यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – आता वाळू वाहतूक होणार 24 तास; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
मराठी माणसांच्या एकजुटीनंतर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. पण तरीही सरकारने शिक्षणाच्या विषयात अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांची समिती नेमून शिक्षणाची थट्टा सुरु केली आहे. त्यामुळे कोणाचीही समिती बसवली तरी आता महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना ठणकावले. दरम्यान, ५ तारखेला विजयोत्सव साजरा केला जाणार असून कालच्या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्व एकत्र आले होते. तीच एकजूट विजयोत्सवात दाखवा, असं आवाहनही त्यांनी केले.
“उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यात मी सहभागी होणार नाही. माझे नियोजित कार्यक्रम त्या दिवशी ठरले आहेत. आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. आम्ही सहभागी होत आहोत, त्यांनी निर्णय घेतला म्हणजे झालं. मी जाणार नाही.माझे इतर नियोजित कार्यक्रम आहेत.त्यामुळे मी ५ तारखेला कार्यक्रमात सहभागी होणार नाही. ” असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.