पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारा रिक्षाचालक गजाआड
![Rickshaw driver who robbed passengers in Pune station area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/crime-2-compressed-780x461.jpg)
पुणे: पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. आठवड्यापूर्वी रिक्षाचालक आणि साथीदारांनी परराज्यातील एका प्रवाशाला लुटले होते. त्यानंतर रिक्षाचालक पसार झाला होता. दत्तात्रय दगडू मोहिते (वय ४३, रा. भेकराईनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. मोहिते रिक्षाचालक आहे. गेल्या आठवड्यात परराज्यातून आलेल्या एका प्रवाशाला रिक्षातून पुणे-सोलापूर रस्त्यावर सोडण्याच्या बहाण्याने रिक्षाचालक मोहिते आणि साथीदारांनी धमकावून लुटले होते. या प्रकरणात मोहितेच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मोहिते पसार झाला होता. पोलिसांकडून मोहितेचा शोध घेण्यात येत होता.
मोहिते लष्कर भागातील ब्ल्यू नाईल हाॅटेलजवळ थांबल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी ज्ञाना बडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, अमोल सरडे, अनिल कुसाळकर, संजय वणवे आदींनी ही कारवाई केली.