पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश शिथिल

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यासह अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या दरम्यान अनेक पर्यटनस्थळी दरडी कोसळल्या, पाण्याचे प्रवाह वाढले होते, अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना समोर येत होत्या. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर बंदी आणण्यात आली होती. जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पुढील सूचना येईपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे बंद राहतील अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. मात्र आता पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश आजपासून म्हणजेच गुरुवारपासून (१ ऑगस्ट) शिथिल करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात असलेले गड, किल्ले, धबधबे या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली होती. मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या आठ तालुक्यांतील गड-किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश आजपासून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक परिस्थिती पाहता प्रतिबंधात्मक आदेश लागू करायचे किंवा नाही, याचा निर्णय प्रांताधिकारी यांनी घ्यावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काल(बुधवारी) दिले आहेत.
हेही वाचा – यूपीएससीची मोठी कारवाई! पुजा खेडकर यांची उमेदवारी रद्द
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचं -जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुण्यात अवघ्या दोन दिवसांत पावसाने हाहाकार माजवला या दरम्यान दुर्दैवी घटना देखील घडल्या. आणखी कोणत्या अनुचित घटना घडू नयेत या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी जमावबंदीचे आदेश 2 जुलै रोजी दिले होते. त्यानुसार, पर्यटनाच्या ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. हे आदेश ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले होते.
पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढून कसलीही दुर्दैवी घटना घडू नये, याकरिता आता स्थानिक परिस्थिती पाहून संबंधित प्रांताधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढावेत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. त्यामध्ये चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.
पुण्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, अनेक ठिकाणचं जनजीनव विस्कळीत झालं. त्यानंतर पुन्हा पावासाने विश्रांती घेतली आहे. गेली दोन दिवस काही प्रमाणात पावसाची संततधार सुरू होती. आज पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.