Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

‘शाळा बंद’ आंदोलनाचा अहवाल शिक्षण विभागाला सादर… किती शाळा बंद, किती शिक्षक गैरहजर?

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) सक्ती, संचमान्यता धोरण अशा विषयांविरोधात शुक्रवारी राज्यभरात करण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनाच्या अनुषंगाने शिक्षकांची हजेरी-गैरहजेरीचा अहवाल शिक्षण विभागाने सादर केला. त्यानुसार राज्यातील २ हजार ५३९ शाळा बंद राहिल्या, तर १३ हजार २१६ शिक्षक विनापरवानगी, ११ हजार ३२९ गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे.

टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करू नये, संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करावी, शिक्षणातील कंत्राटीकरण बंद करावे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी राज्यभरात शाळा बंद आंदोलनाची हाक दिली होती. संस्थाचालकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने ४ डिसेंबर रोजी पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा –  ‘इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लवकरच पूर्ण होणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना संपापासून परावृत्त करण्यासाठी आवाहन करावे, आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, ५ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नियमितपणे सुरू राहतील, याची दक्षता घेण्यासाठी सर्व शिक्षणाधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, विनापरवाना गैरहजर राहणारे किंवा संपात सहभागी होऊन शाळेच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या शिक्षकांवर ‘काम नाही, वेतन नाही’ या तत्त्वानुसार, तसेच नियमांनुसार शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश शाळांना द्यावेत, ५ डिसेंबर दिवशी किती शाळा सुरू होत्या आणि किती कर्मचारी उपस्थित/अनुपस्थित होते, याचा सविस्तर अहवाल शासनास सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने बंद राहिलेल्या शाळा, गैरहजर शिक्षकांची आकडेवारी राज्यभरातील शिक्षणाधिकारी, महापालिका, नगरपालिका शिक्षण अधिकाऱ्यांकडून संकलित करून शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केली. या आकडेवारीनुसार, राज्यात २४ हजार ४९० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २ लाख २४ हजार ३६६ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी १३ हजार २१६ शिक्षक विनापरवानगी, ११ हजार ३२९ गैरहजर राहिले. तर २ हजार ५३९ शाळा बंद असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. आता शासनाच्या ४ डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे.

डॉ. महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button