प्रौढ लसीकरण आणि COPD उपचारासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शक; वैद्यकीय संघटनेतर्फे राज्यपालांना प्रकाशने भेट
Association of Physicians of Indiaच्या महाराष्ट्र शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट

मुंबई : असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (API)च्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने राज्यपालांना भेट दिली.
यामध्ये ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ आणि ‘COPD Compass 2026’ या प्रकाशनांचा समावेश आहे. ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ हे इंडियन मेडिकल असोसिएशनने विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने प्रकाशित केले आहे. प्रौढांच्या लसीकरणासंदर्भातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शिफारसी या प्रकाशनात देण्यात आल्या आहेत.
यावेळी डॉ. आगम वोरा यांनी लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. विषाणूजन्य संसर्गामुळे दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असून, प्रभावी लसीकरणाच्या माध्यमातून अनेक मृत्यू टाळता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘संस्कृती आणि परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती’; सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसले
दुसरे प्रकाशन ‘COPD Compass 2026’ हे भारतातील दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकार अर्थात COPDच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. COPDचे निदान, उपचार आणि व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांच्या पॅनेलने केलेल्या शिफारसींचा यात समावेश करण्यात आला आहे.
या भेटीदरम्यान डॉ. राकेश बडदे, डॉ. मिलिंद नाडकर्णी, डॉ. अमित सराफ, डॉ. जयस लेले, आशुतोष पांडे तसेच झायडस हेल्थकेअरच्या एमडी स्वाती दलाल यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.





