सात वर्षांनंतर क्षी जिनपिंग भारतात; BRICS परिषदेसाठी सप्टेंबरमध्ये मोठ्या शिष्टमंडळासह येणार?
लडाख सीमासंघर्षानंतर भारत-चीन संबंध सुधारण्याची संधी; मोदी-जिनपिंग द्विपक्षीय भेटीकडे जगाचे लक्ष

नवी दिल्ली : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तब्बल सात वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जिनपिंग मोठ्या शिष्टमंडळासह भारतात दाखल होणार असल्याची माहिती रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
भारतामध्ये १२ आणि १३ सप्टेंबरदरम्यान BRICS शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. २०२० मधील लडाख सीमासंघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण राहिले असून, जिनपिंग यांच्या संभाव्य दौऱ्याकडे द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जिनपिंग यांच्यासोबत सुमारे ४०० अधिकाऱ्यांचे मोठे शिष्टमंडळ भारतात येण्याची शक्यता आहे. चिनी अधिकाऱ्यांची पथके सुरक्षेची पाहणी तसेच निवास व्यवस्थेच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – सरकारी शाळांची वास्तविक स्थिती जाहीर करा; अभिजीत दिपकेंचे देशातील शिक्षण मंत्र्यांना पत्र
या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता असून, सीमावाद, प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक सहकार्य यांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. मात्र, बैठकीचा अंतिम अजेंडा अद्याप निश्चित झालेला नाही.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने BRICS सहकार्याला महत्त्व देत भारताच्या अध्यक्षपदाला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. मात्र, जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याबाबत अद्याप भारत किंवा चीनकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
जिनपिंग यांचा संभाव्य भारत दौरा आणि मोदी-जिनपिंग भेटीतून भारत-चीन संबंधांमध्ये नवा संवाद सुरू होतो का, याकडे आता जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे.





