राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज
पुणे | प्रतिनिधी
राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने बुधवारी (दि. 1) धुमाकूळ घातला. वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कलमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर आदी धरण साखळ्यांमध्ये देखील चांगला पाऊस पडला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी शिवाजीनगर 75.4 मिलीमीटर, लोहगाव 86.2 मिलीमीटर, पाषाण 83.4 मिलीमीटर, चिंचवड 103 मिलीमीटर, लवळे 75 मिलीमीटर, मगरपट्टा 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासात कोकण गोव्यात ब-याच ठिकाणी पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण गोवा व मराठवाड्यात ब-याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे 12.4 अंश सेल्सियस नोंदवले गेले. तर मुंबई (कुलाबा) येथे सर्वाधिक 24.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे पुढील दोन दिवस राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुरुवारी कोकण गोवा परिसरात महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
तर कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. शुक्रवारी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.