TOP Newsताज्या घडामोडीपुणे

दिवाळीआधी पावसाची सुटी

पुणे : र्नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून शनिवारी (१५ ऑक्टोबर) परतीचा प्रवास केला असून, पुढील दोन दिवसांत बहुतांश विदर्भातून मोसमी वारे परत फिरणार आहेत. या कालावधीत पुढील तीन दिवसांत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र वगळता मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दिवाळीच्या आधी काही दिवस पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. मोसमी वारे सध्या राज्यातून परतीचा प्रवास करीत आहेत.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांतून मोसमी वारे माघारी फिरले आहेत. राजस्थानमधून २० सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर उत्तर भारतात मोठा पाऊस झाला. हंगामाचा कालावधी संपल्यानंतर १ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातही मोठय़ा पावसाने हजेरी लावली. गेल्या १५ दिवसांत राज्यात सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातून मोसमी वारे माघारी गेले असल्याने या भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भातही आता मोसमी पावसाचा जोर घटतो आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भातील आणखी काही भागांतून मोसमी पाऊस परतीचा प्रवास करणार असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र वगळता कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी १६ ते १८ या तीन दिवसांच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण विभागातील मुंबई, ठाणे भागांत १६, १७ ऑक्टोबर, तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांतही १६ ते १८ या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडय़ात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, बीड, नांदेड, लातूर आदी भागांतही याच कालावधीत पावसाची शक्यता आहे. विदर्भात १६ ऑक्टोबरपासून अनेक ठिकाणी हवामान कोरडे होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button