पोलीस ठाण्यातच फिनाईल पिऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे | पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नीच्या भांडणातून हा प्रकार घडला आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित महिलेविरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आफरिन उमर शेख (वय 21, नवाझिस पार्क, कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी येनभाऊ भिलारे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि तिच्या पतीचे भांडण झाले होते. पती चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे पत्नी आणि तिच्या दोन मित्रांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी तो पोलीस स्टेशनमध्ये आला होता. कोंढवा पोलीस स्टेशन मधील अंमलदार कक्षात तो बसल्यानंतर त्याच्यापाठोपाठ पत्नीही आली आणि तिने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.





