‘पुणे पुस्तक महोत्सव जगासाठी प्रारूप’; मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाला १० लाखांपेक्षा अधिक लोकांनी भेट दिली. ४० कोटी रुपयांची पुस्तकविक्री झाली. जगासाठी हा महोत्सव आता प्रारूप ठरला आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे दि. १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव झाला. या महोत्सवाच्या आयोजनासाठी योगदान दिलेल्या विविध व्यक्तींच्या गौरवाचा कार्यक्रम भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या प्रांगणात झाला. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
“एनबीटी’चे अध्यक्ष मिलिंद मराठे, मुख्य संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, तसेच, आनंद काटीकर, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे या वेळी उपस्थित होते. पुढील महोत्सव दि. १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
हेही वाचा – तिरुपती मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी
पाटील यांनी तरूण स्वयंसेवकांना या महोत्सवातून खूप शिकायला मिळाल्याचे नमूद केले. तरडे म्हणाले, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आता पुणे पुस्तक महोत्सव ही महाराष्ट्राची नवी ओळख होत आहे. राजेश पांडे म्हणाले, महोत्सवाला समाजमाध्यमांतूनही प्रचंड प्रतिसाद होता. १ कोटींपेक्षा जास्त लोकांनी महोत्सवाच्या चित्रफिती पाहिल्या. ७७ लाख लोकांनी महोत्सवाविषयी सर्चिंग केले. या महोत्सवात स्वयंसेवकांचेही योगदान महत्त्वाचे होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महोत्सवाच्या काळात वाचनसवयींचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाची प्राथमिक निरीक्षणे डॉ. गोसावी यांनी मांडली. सर्वेक्षणात २४ ते ५० या वयोगटातील ५५ टक्के पुरुष, ४५ टक्के महिलांचा समावेश होता. महिलांना चरित्र आणि अध्यात्माची पुस्तके वाचायला आवडतात. पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांना माहितीपर, चरित्र, इतिहासविषयक पुस्तकांमध्ये रस आहे. प्राथमिक शिक्षण झालेल्यांचा अध्यात्म, धार्मिक पुस्तकांकडे कल आहे, तर नोकरदारांना चरित्र, इतिहास, स्वमदत (सेल्फ हेल्प) प्रकारची पुस्तके आवडतात. विद्यार्थ्यांचा कल इतिहास आणि तांत्रिक विषयांच्या पुस्तकांचे असल्याचे दिसते. या सर्वेक्षणाचे सविस्तर निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.





