पुणे विमानतळावर प्रवाशाकडे २८ जिवंत काडतुसे आढळल्यानं खळबळ
पुण्यातून दीपक काटे हा प्रवासी काडतुसे घेऊन कुठे निघाला होता?
पुणे : पुणे विमानतळावर एका प्रवाशाकडे २८ जिवंत काडतुसे आढळल्यानं खळबळ उडालीय. प्रवाशाकडून काडतुसे जप्त केली असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ही कारवाई केली. प्रवासी पुण्याहून हैदराबादला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. त्यावेळी त्याच्याकडे २८ जिवंत काडतुसे सापडली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी १०.४५ वाजता दीपक काटे हा प्रवासी हैदराबादला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. हैदराबादकडे जाणाऱ्या विमानासाठी सुरक्षा तपासणीसाठी काटे थांबला होता. सुरक्षा रक्षकांनी जेव्हा दीपक काटे या प्रवाशाची बॅग तपासली तेव्हा त्यात २८ जिवंत काडतुसे आणि मॅगझिन आढळून आले. विमानतळ सुरक्षा रक्षकांनी तात्काळ काटे यांना ताब्यात घेतले आणि विमानतळ पोलिसांकडे नंतर सुपूर्द केलं.
पुण्यातून दीपक काटे हा प्रवासी काडतुसे घेऊन कुठे निघाला होता? त्याच्या बॅगेत इतर कुणी ही काडतुसे ठेवली का? याचा तपास आता विमानतळ पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. पुणे विमानतळावर घडलेल्या या प्रकाराने खळबळसुद्धा उडालीय. विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास केला जात आहे.





