धुलवडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट ; ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या मोहिमेसाठी ८० पथके मध्यरात्रीपर्यंत कार्यरत

पुणे : शुक्रवारी होणार्या धुलवडीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. शहरात वेगवेगळ्या भागात स्थानिक पोलिस आणि वाहतूक विभागाने तब्बल ८० पथके नेमण्यात येणार आहे़. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी २ पथके असणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून मध्यरात्री दिड वाजेपर्यंत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
हेही वाचा – कर्कश सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांकडून ‘बुलडोझर’
होळीच्या दुसर्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. होळीची राख घेऊन ती एकमेकांना लावण्याची पारंपारिक प्रथा आता मागे पडली आहे. उत्तर भारतीयांच्या वाढत्या प्रभावामुळे धुलवडीच्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यावेळी अनेक जण भांग पिणे, दारु पिऊन रंग एकमेकांवर उधळतात. तसेच ट्रिपल सीट बसून वाहनावरुन वेगाने जात असतात. अशा तरुणाईकडून अपघात होऊ नयेत, यासाठी शहर पोलीस दलाने विशेष मोहिम आखली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून मध्यरात्री दीड वाजेपर्यत सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येणार असून मद्य प्राशन करुन वाहन चालवत असेल तर त्यांच्यावर जागेवरच कारवाई करण्यात येणार आहे. उत्सव साजरा करताना मद्यप्राशन करुन वाहन चालवू नका, असे आवाहन शहर पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.