सोलर कुकरच्या निर्मितीत रमले बालवैज्ञानिक

पुणे l प्रतिनिधी
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, द इंन्स्टिट्युटशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) पुणे लोकल सेंटर आणि सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रयोगातून विज्ञान’ या उपक्रमांतर्गत सौरऊर्जा कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उदघाटन उद्योजक श्री तांबे यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी सोलर कुकरची निर्मिती आणि त्यावर पदार्थ शिजवत प्रत्यक्ष प्रयोगातून सौर ऊर्जेतील विज्ञान जाणून घेतले.
शिवाजीनगर येथील ‘द इंन्स्टिट्युटशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) येथे झालेल्या कार्यशाळेत तज्ज्ञ विवेक काब्रा यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी विपिन मुनोत, विलास रबडे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ, अशोक तातुगडे, प्रा. विनय र. र., संजय मा. क. आदी उपस्थित होते. 8 वी व 9 वीचे एकूण 40 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
“सोलर कुकर बनवून स्वतः त्यात अन्नपदार्थ शिजवून विद्यार्थ्यांनी हा सूर्यप्रसाद खाल्ला. सौरऊर्जा ही न संपणारी आहे. स्वतः हाताने सोलर कुकर बनवल्याने त्यांना यातील विज्ञान सहजपणे समजले. अशा प्रयोगातून विज्ञान समजून घेण्याची वृत्ती विद्यार्थी दशेतच विकसित होते,” असे विलास रबडे यांनी सांगितले. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना सौरऊर्जचे महत्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा होता. प्रयोगातून विज्ञान या उपक्रमातून शाळाशाळांतून जागृती करण्यात येत असल्याचे अशोक तातुगडे यांनी नमूद केले.
सोलर तज्ज्ञ विवेक काब्रा म्हणाले, “सौरऊर्जा भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. ते समजून घेण्यासाठी सौरकुंभ हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. बालवयातच प्रत्येक मुलाला सौरऊर्जेचे महत्व समजले, तर त्याचा वापर करणे सहज शक्य होईल. अशा प्रयोगातून मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने सौरऊर्जेचा वापर करण्याची प्रेरणा मिळेल. प्रत्येक शाळांमध्ये सोलर कुकर निर्मिती व अन्य प्रयोग राबवले जावेत.”




