ताज्या घडामोडीपुणे

पालखी प्रस्थानानंतर तळावर गतीने स्वच्छता; विभागीय आयुक्तांकडून यंत्रणेचे अभिनंदन

संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करा-डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीने सुरुवात होऊन पूर्वीसारखी चकाचक होत आहेत; विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केले असून संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करावे, असे आवाहनही केले आहे.

पालखी तळ आणि विसाव्याची ठिकाणी पालखी प्रस्थानानंतर स्वच्छ राहून रोगराईला थारा मिळणार नाही याची दक्षता जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली प्रशासन घेत आहे. दोन्ही पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी प्रत्येकी शंभर स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पालखी मुक्काम, विसावा आणि पालखी मार्ग अशा सर्वच ठिकाणी सफाई करुन ओला, सुका असा घनकचरा कचरा प्रक्रिया प्रकल्पांना पाठविण्यात येत आहे. कचरा संकलनासाठी त्या त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी आपल्या घंटागाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वडकी नाला ते सासवड या मार्गावर तसेच ऊरूळी देवाची, वडकीनाला, झेंडेवाडी, पवारवाडी या विसाव्याच्या ठिकाणी सवळपास दीड टन प्लास्टिकसह सुका कचरा आणि तीन टन ओला कचरा गोळा करुन प्रक्रिया प्रकल्पाला पाठविला आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर टोल नाका ते उरुळी कांचन या मार्गादरम्यान तसेच कदम वाकवस्ती मुक्काम आणि मांजरी फार्म, लोणकाळभोर रेल्वे स्टेशन विसाव्याच्या ठिकाणी सुमारे दोन टन ओला कचरा आणि सहाशे ते सातशे किलो सुका कचरा जमा करुन प्रक्रियेसाठी पाठविला आहे.

शौचालयांचीही वेळेत स्वच्छता
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी 1 हजार 800, श्री संत तुकाराम महाराज पालखीसाठी 1 हजार 200 तर श्री संत सोपानकाका महाराज पालखीसाठी 250 तात्पुरती शौचालये उपल्बध करुन देण्यात आलेली आहेत. ही शौचालये पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आदल्या दिवशी दुपारी 4 वाजल्यापर्यंत लावण्यात येतात आणि पालखी येण्याच्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत कार्यान्वित करुन वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

शौचालय स्वच्छतेसाठी व्यव्यस्था
* 25 शौचालयांमागे 1 सफाई कामगार
* 10 शौचालयांमागे 1 पाण्याचा ड्रम
* 100 शौचालयांमागे 1 दहा हजार लिटरचा टँकर
* 100 शौचालयांमागे 1 जेटींग मशीन व सक्शन मशीन
* एका शौचालयाची 200 लिटरची क्षमता
* एका शौचालयाची दिवसातून 5 वेळा सफाई

एका दिवसात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामी सुमारे 1 हजार 300 लिटर मैला उपसा करुन सासवड नगर पालिकेच्या एसटीपीला प्रक्रियेसाठी पाठविला आहे. अशाच प्रकारची व्यवस्था श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरही करण्यात आली आहे. आज अनुक्रमे जेजुरी मुक्कामाची आणि वरवंड मुक्कामाची तात्पुरती शौचालये वापरात आली आहेत. उद्यासाठी वाल्हे येथे आणि उंडवडी गवळ्याची येथे शौचालये उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून 4 वाजेपर्यंत तयार करण्यात येणार आहेत.

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्येक पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी अशीच स्वच्छता ठेवावी, अशा सूचना दिल्या आहेत. या सर्व स्वच्छता कामाबद्दल वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले असून यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास लाभ होत असल्याच्या प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button