राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांची कसून तपासणी
बावधन पोलिसांकडून कारवाई : मुंढवा जमीन खरेदी विक्री घोटाळा प्रकरण
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात अखेर अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार आणि मामेभाऊ दिग्विजय पाटील हे सोमवारी (दि. १५) बावधन पोलीसांसमोर हजर झाले. सकाळपासून बावधन पोलीसांकडून पाटील यांची कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल तेजवाणी आणि दस्त नोंदणी करणारे सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शासनाच्या नियमांनुसार या जमिनीचा खरेदी-विक्री दस्त करताना ५ कोटी ८९ लाख ३१ हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. तरीही आरोपींनी संगनमत करून शासनाला देय असलेले सुमारे ६ कोटी रुपये मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केली. याप्रकरणात शितल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली. तर, बावधन पोलीसांनी ७ डिसेंबर रोजी या प्रकरणातील आरोपी सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला भोर येथील राहत्या घरातून अटक केली. तेजवानी आणि तारू हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर, गुन्हा दाखल झाल्यापासून दिग्विजय पाटील हे सातत्याने पोलीसांसमोर हजर होण्यास टाळाटाळ करीत होते. अखेर सव्वा महिन्यानंतर पाटील स्वत:हून चौकशीसाठी बावधन पोलीस ठाण्यात हजर झाले. सकाळी अकरा वाजता ते पोलीस ठाण्यात आले.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्यामार्फत पाटील यांची कसून चौकशी करण्यात आली. जमिन खरेदी-विक्री व्यवहार, दस्त नोंदणी याबाबत पोलीसांनी जबाब घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत दिग्विजय पाटील यांची चौकशी सुरू होती, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी दिली.
’’दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाब घेतला. जबाबाचे योग्य विश्लेषण करून पुढील तपासाअंती निर्णय घेतला जाईल.’
– विशाल गायकवाड (पोलीस उपायुक्त)
तारूच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ
बावधन पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात कागदपत्रांची तपासणी केली असता या प्रकारातील दस्त नोंदणी रवींद्र तारू यांच्या अधिकारात झालेली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार, त्यांना भोर येथील राहत्या घरातून ७ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तारू याला पौड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तारू याला आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याच्या पोलीस कोइडीची मुदत सोमवारी (दि. १५) संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर केले असता १९ डिसेंबरपर्यंत तारू याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.





