पिंपरी, चिंचवड अन्ं भोसरी महायुतीच्या उमेदवारांची खर्चात ‘आघाडी’

पिंपरी |महाईन्यूज|
निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांनी निवडणूक खर्चात आघाडी घेतली असून, महाआघाडीचे उमेदवार मात्र त्यात पिछाडीवर आहे. निवडणूक आयोगाकडे दोन टप्प्यांत सादर करण्यात आलेल्या आर्थिक तपशीलातून हे समोर आले आहे.
तिन्ही मतदारसंघातून युतीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी केलेल्या खर्चाची रक्कम १९ लाख १९ हजार ८६६ रुपये आहे. आघाडीकडून ११ लाख ४० हजार ४६५ रुपये खर्च केला आहे. चिंचवडमधून युतीच्या उमेदवाराने चार लाख ९० हजार ३१६ रुपये तर आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराने दोन लाख ८७ हजार ७२५ रुपये खर्च केला आहे. अन्य अपक्ष उमेदवारांनी केलेला खर्च एक लाखाच्या आत आहे.
पिंपरीत महायुतीच्या उमेदवाराने पाच लाख एक हजार ९८१ रुपये तर महाआघाडीच्या उमेदवाराने आतापर्यंत चार लाख १५ हजार ६५२ रुपये खर्च केला आहे. याखेरीज तीन अपक्ष उमेदवारांनी एक ते अडीच लाखांदरम्यान प्रचारावर खर्च केला आहे. भोसरीतील युतीच्या उमेदवाराने प्रचारावर केलेला खर्च नऊ लाख २७ हजार ५६९ असून आघाडीने पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवाराने चार लाख ३७ हजार ८८ रुपये खर्च केला आहे. पिंपरीतून १८, भोसरीतून १२ व चिंचवडमधून ११ उमेदवार असे ४१ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना शनिवारी (ता. १९) तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे. विधानसभेचे मतदान सोमवारी (ता.२१) होणार आहे.





