‘पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचे नाव द्या’; खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

पुणे: देशात भाजपचे सरकार आल्यानंतर नामांतरणाची मोहीम गतीमान झाली असून शहरांसह अनेक जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचेही नामांतर करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव प्रयागराजचं करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही दोन शहरांची नावे बदलली आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्यात आलं आहे. त्यासोबतच, आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालं आहे. त्यामुळे, जनभावनांचा आदर करत हे नामांतर करण्यात आल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आलं. आता, पुणे शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे.
पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधीत प्रश्न मी या बैठकीत उपस्थित केले. यातील एक मुद्दा होता तो म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुचार केला आहे. कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे. परंतु, पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे, आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं.
हेही वाचा – पुण्याच्या वाहतूक कोंडीचा खुद्द वाहतूकमंत्री गडकरींना फटका; दौराचं करावा लागला रद्द
पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव द्या, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. म्हणून रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. पुणे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण हे स्वच्छता आणि इतर विषयांवरही करण्यात यावे, असेही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांचा मोठा इतिहास आहे. पुण्यातील शनिवार वाडा आजही पेशवे घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो. त्यामुळेच, पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगत पुणे जंक्शनचे नामांतर करण्याची मागणी खासदार यांनी केली आहे. श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव देण्याची ही मागणी आहे.
राज्य सरकारने गतवर्षी मुंबई शहरातील 7 रेल्वे स्थानकांची नावे बदल्याचा प्रस्तावास विधान परिषदेत मंजुरी दिली होती. त्यात मध्य रेल्वेवरील दोन, पश्चिम रेल्वेवरील दोन आणि हार्बर रेल्वे मार्गावरील 3 स्थानकांचा समावेश आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर, हा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावे बदलल्यानंतर आता पुणे शहरातील प्रमुख पुणे जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे.