“शरद पवारांना सोडून चूक केली”; भास्कर जाधवांचे नाराजीचे सुर; संजय राऊतांनी दिले प्रत्युत्तर

Bhaskar Jadhav : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांना सोडून चूक केली, असे विधान भास्कर जाधव यांनी केले आहे. भास्कर जाधव हे सुरुवातील शिवसेनेत होते. पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भास्कर जाधव यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
भास्कर जाधव यांनी एका मुलाखतीत पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणे, ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती असे म्हटले होते. याबाबत विचारले असता भास्कर जाधव म्हणाले की, “शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय चुकीचा होता. मी त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. मी तो निर्णय घेतला तो चुकीचा होता, हे मी स्पष्टपणे बोललो आहे. तेथे मी लपूनछपून काही बोललो नाही. पण, याचा अर्थ मला त्याची खंत वाटते, असं नाही, ” असे पत्रकारांसोबत बोलताना भास्कर जाधव यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा – ‘पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचे नाव द्या’; खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी
राजकीय संन्यास घेण्याचे संकेत
भास्कर जाधव पुढे म्हणाले की, “मला मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं. तेव्हाही बोललो, आजही बोलतो आणि उद्याही बोलेन. का मिळायला नको होतं? याचं कारण कोणाकडे असेल तर त्यांनी स्पष्ट करावं. परंतू नाही मिळालं, म्हणून रडत बसायचं नाही तर लढायचं. मी रडत बसलो नाही. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जे फुटून गेले, त्यांच्यासोबतही मी गेलो नाही. मी लढतोय, नाही मिळालं ते नाहीच मिळालं. कार्यकर्ते कमी होतायत म्हणून निवृत्ती घेण्याचं कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे, आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा, असं वाटतं,” असे म्हणत त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले.
संजय राऊतांचे प्रत्युत्तर
दरम्यान, यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत, शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीत त्यांचे नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणात असतात. त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील. आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय वेदना आहे? ते आम्ही नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.