खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली किरीट सोमय्यांची भेट
![MP Udayan Raje Bhosale called on Kirit Somaiya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Udayanraje.jpg)
पुणे | प्रतिनिधी
भाजपा नेते किरीट सोमय्या हे काल पुणे दौऱ्यावर असताना महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करतानाना आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि मोठी झटापट झाली. त्यात सोमय्या पायर्यांवर पडल्याने त्यांना दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर रात्री उशिरा पुण्यात जाऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रुग्णालयात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना लोकशाही संकटात सापडल्याचे म्हटले.
उदयनराजे पुढे म्हणाले की, ‘माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांच्यावर झालेला प्राणघातक ठरणारा हल्ला अतिशय निंदनीय आहे. सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करून किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अशा हल्याच्या घटना घडल्यास अशा घटनेचे कोणीही समर्थन करू शकणार नाही’, असेदेखील ते यावेळी म्हणाले.