शहरातील कोणत्याही भागातून मिळणार विमानतळासाठी मेट्रोची कनेक्टिव्हीटी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-11-780x470.jpg)
पुणे : शहराच्या कोणत्याही परिसरातून येणाऱ्या प्रवाशांना पुणे विमानतळावर जाता येईल, अशीच मेट्रोची कनेक्टीव्हीटी करण्यात येणार आहे. त्यासाठी मेट्रो मार्गात बदल सुचविले असून, त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचनाही दिल्याचे केंद्रीय नागरी हवाई वाहतुक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुणे विमानतळावरील डीजी यात्रा शुभारंभ झाल्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वनाज, हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवड भागातून विमानतळावर जाण्यासाठी थेट मेट्रो सेवा नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, मेट्रोची सेवा विमानतळापर्यंत मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली. त्याची दखल घेत, मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ बैठक घेऊन नवीन मेट्रोमार्गासह काही मार्गांचे विस्तारीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये खडकवासला ते खराडी असा मेट्रोचा प्रस्तावित मार्ग आहे. मात्र, त्यात बदल करून खडकवासला ते विमानतळ असा मार्ग व्हावा. त्याबाबतचा डीपीआर तयार करण्यात यावा, असा सूचना मेट्रोला दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
हेही वाचा – रिंगरोडच्या भूसंपादनासाठी पीएमआरडीएकडून १३ प्रस्ताव
वनाज ते रामवाडी हा मार्ग वाढतोय. तो मार्ग वनाज ते वाघोली असा होईल. दुसरा मार्ग निगडी ते स्वारगेट हा मार्ग पूर्ण झाला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो पूर्ण होत आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळाला जाण्यासाठी कनेक्टीव्हीटी असेल, याचा विचार करून हे मार्ग जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासा सुखकर आणि कोंडीमुक्त होणार आहे. वेळेची बचत होणार असून, लवकरच या कामाला सुरवात होईल, असा विश्वासही मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.