मराठ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी षडयंत्र : मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारी शांतता रॅली नगर शहरात
पुणे : मराठा आरक्षण आंदोलन जोर धरत असताना आता सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असे एकमेकांच्या विरोधातील विभागाचा वाद उफाळून काढला आहे. तो कसा काढला जात आहे, हे आता आपल्याला माहिती नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांचा आंदोलन मोडून काढायचं असा डाव आखला जात आहे. आता मागे हटायचं नाही तर आरक्षण दिलं नाही आपल्याला राजकारणात गेल्याशिवाय पर्याय नाही. राजकारणात जात सत्ता काबीज करावी लागणार आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी नगर येथील जाहीर सभेतून केले.
देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी नगर शहरात आली . त्यानंतर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सकल मराठा सेवा संघाच्या वतीने मनोज जरांगे यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले.
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा आंदोलन एक वर्ष झालं सुरू आहे. हे आंदोलन मोडलं नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या पोटामध्ये दुखत आहे. यांनी आता आपल्याला त्रास देण्याची भूमीका घेतली आहे. एवढेच नाही तर आता विभागात विभागामध्ये आता भांडणे लावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा एकत्र येत नाही, त्यानंतर म्हणायचं विदर्भ येथील मराठा एकत्र येत नाही, मराठवाडा व विदर्भाचे पटत नाही असे सांगायचे व एकमेकांमध्ये भांडण लावण्याचे काम आता केलं जात आहे. त्यामुळे आता तुम्ही वेळी सावध राहा, असे जरांगे पाटील म्हणाले. हे विभागांमध्ये का भांडण लावतात हे आपल्याला कळत नाही, पण आता आपण सगळेजण एक आहोत व जे असे भांडण लावतात त्यांनी या ठिकाणी येऊन बघावं की कसा मराठा एकवटला आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.
मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा नाही असं षडयंत्र रचले जात आहे यांच्या डोक्यामध्ये फक्त सत्ता असाच माज यांना आलेला आहे. मी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी भांडत आहे व लढत आहे हे मात्र आता आपल्याला जर आरक्षण मिळवायचा असेल तर आता आपल्याला सत्तेमध्ये जावं लागेल. हे आरक्षण दिला नाही आपल्याला आता ते आरक्षण हिस्टरी घ्यावं लागेल असे ते म्हणाले. आपल्याला सत्तेमध्ये जावे लागेल, त्यासाठी मतभेद हे बाजूला ठेवावे लागतील. जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला तुम्ही निवडून आणायचं, तुमचं त्याच्याशी जरी वैर असलं तरी ते बाजूला ठेवा व त्याला मतदान करा, असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केलं.
सर्व पक्ष आता आपल्या भूमिकेकडे पहात नाही. आपण यांना मोठे केलं, मात्र हे आता आपल्याकडे कानाडोळा करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. ज्यांना आपण जोडून दिलं आता ते आपल्या विरोधामध्ये बोलू लागले आहेत. त्यामुळे तुम्ही आता जागृत राहिलं पाहिजे. भावनेच्या आहारी आता हे निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी ओळखून घेतलं आहे. त्यामुळे आता अशा भूलथापांना बळी पडू नका असे ते म्हणाले. आता त्यांनी छगन भुजबळ, प्रवीण दरेकर यांना पुढे करत त्रास देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आता आपल्या ज्या संघटना आहेत त्या फोडण्याचं काम सुद्धा यांनी सुरू केलं आहे. तुम्ही आता सावध रहा कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटायचं नाही, असा निर्धार करा असं ते म्हणाले.
मराठा समाजामध्ये जे कोणी नोकरी करत आहे उद्योग धंदा करत आहे अशा लोकांना जर त्रास कोणी देत असेल तर तुम्ही सर्वजण एकत्र या व त्या माणसाच्या पाठीशी उभे रहा व इतरांना अद्दल घडवा असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले. आता जनताही जागृत झाली आहे. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिला आहे काय त्यांनी करायचं ते करून दाखवलं असे ते म्हणाले. आपणास समाज मोठा करणे या आपली जबाबदारी आहे असे ते म्हणाले. आपली शक्ती ही आपल्या जातीला करण्यासाठी करायची उगाच कोणासाठी ती शक्ती वाया घालवायची नाही, वास्तविक पाहता आपण जातीला बाप म्हणलं पाहिजे पण आता पक्षातील नेत्याला लोक बाप म्हणू लागले असे ते म्हणाले. तुम्ही जर आपल्या पोरांकडे जातीकडे जर बघितला नाही तर तुम्हाला पुढच्या दहा पिढ्या सुद्धा माफ करणार नाही. तुम्ही जर बघायची भूमिका घेतली तर तुमचे वाटोळे होणार आहेत तुमच्या मुलाबाळांचे वाटोळे होणार आहे लक्षात ठेवा. तुम्ही आता घरात, शेतात बसू नका रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्ही रस्त्यावर आले व तुमची ताकद दाखवली तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही जरांगे यांनी व्यक्त केला.
मराठ्यांनी 100 टक्के मतदान करा
मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करा. जातीच्या हितासाठी एकत्र या. 28 तारखेला नगरमधील सर्व मराठ्यांनी आंतरवालीत या. ठरलं तर उमेदवार कोणी असू द्या, समाजाने सांगितलं तर तो उमेदवार. एक ही माणूस तीर्थक्षेत्राला जायचे नाही. गोर गरीबांची सत्ता येईल, हे सर्वांना माहित आहे. उमेदवार उभा करण्यापेक्षा पाडापाडीत मजा आहे आपल्याला ते सुद्धा करावं लागेल असं ते म्हणाले.
मुंबईत 18 तक्के मराठा आहे. जनतेने सत्तेच्या मस्तीचा बदला घेतला. त्यांनी आपली शक्ती बघितली नाही. आपला समाज मोठं करणे ही आपली जबबदारी आहे. आपले पोरं मोठं करायचे. जातीला बाप म्हटलं पहिजे. हे पक्षाला नेत्याला बाप म्हणायला लागले. मराठ्यांना मोठं करणारा 75 वर्षत एकही नेता मिळाला नाही. माझी रोज सलाईन सुरु आहे. मला माझा समाज मोठा झाला पाहिजे.. मला शरीर महत्वाचं नाही. समाजाची मान खाली होईल असं करणार नाही असे जरांगे म्हणाले
…ते काय तलवार चालवणार
तुला चष्मा पुसता येत नाही का तू काय तलवार चालवणार असा टोला छगन भुजबळ यांना जरांगे यांनी यावेळी लगावला. छगन भुजबळने शिवसेनेचे वाटोळे केलं, राष्ट्रवादीचा वाटोळे केलं. हा पालथा पायाचा आहे, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांनी यावेळी केला.
सागर बंगल्यावर बसून हे काय करतात?
लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो पराभव झाला तो सगळ्यांनी पाहिला आहे. आता विनाकारण आम्हाला म्हणजे मला त्रास देण्याचा षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेला आहे मला नोटिसा पाठवल्या. मला अडचणीत आणण्याचं काम केलं. माझ्यामागे एसआयटी लावून दिली. माझ्या समाजाला आरक्षण हवं ते मी मागतो आहे. मात्र यांना त्याची अडचण झाली आहे. अडचण मला नाही तर देवेंद्र फडणवीस यांना झाली आहे, म्हणून हे सागर बंगल्यावर बसलेले आहेत. तेथून हे षडयंत्र रचत आहेत, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाण साधला. ते म्हणाले की, ‘ गिरीश महाजन हे सुरुवातीला खूप तावात होते. पण लोकसभेमध्ये मराठा मतदारांची ताकद दिसून आली. त्यांच्या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या एक लाखाच्या पुढे आहे. हे गणित लक्षात आल्यानंतर गिरीश महाजन यांनी नरमाईची भूमिका घेतली.’
आपल्याला आपली जात आणि आपली लेकर मोठी करायची आहेत. त्यामुळे कोणतेही पक्षाचा विचार करू नका. कोणताही नेता आपल्यापेक्षा मोठा नाही. या राज्यातील मोठ्या भावाची व लहान भावाची भूमिका मराठा समाज पार पाडली आहे. पण आज आमच्या लेकरांना ऍडमिशन मिळत नाही. एक टक्क्याने ऍडमिशन गेल्याने त्याचं वर्ष वाया जात आहे. आज तर मराठा समाजाने ज्या नेत्यांना आणि पक्षांना मोठा केलं, तेच मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत . त्यामुळे तुमचं नेमकं कोण आहे? याचा विचार करा, असेही जरांगे म्हणाले.
जोरदार स्वागत
प्रचंड गर्दीत मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे नगरच्या वेशीवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सुपा चौकांत उपस्थित होते. यावेळी मराठा साजाच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन अन स्वागत केले. यावेळी महिला भगिनींची देखील लक्षणीय उपस्थिती होती. जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर मुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान यावेळी नगर सकल मराठा समाजाच्या वतीने हजारोंंच्या संख्येने केडगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे स्वागत करण्यात आले.नगर शहरांमध्ये उभे असलेली काढण्यात आली यावेळी मनोज जरांगे यांचे प्रत्येक चौका चौकामध्ये स्वागत करण्यात आले भगवे झेंडे, भगव्या कमानी तसेच मोठे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले होते. ज्या ठिकाणी सभा चौपटी कारंजा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, त्या ठिकाणी भव्य असे मंडप उभारण्यात आले होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता तो लक्षवेधी ठरत होता.
पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त
शांतता रॅलीसाठी 1 अपर पोलिस अधीक्षक, 3 उपअधीक्षक, 11 पोलिस निरीक्षक, 28 सहाय्यक व उपनिरिक्षक, 450 पोलिस कर्मचारी असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, सीसीटीव्ही व ड्रोन कॅेर्याद्वारे रॅली मार्ग व परिसरात वॉच ठेवण्यात आला आहे.