मांत्रिकाने सहा महिन्यांच्या मुलावर जीवघेणे उपचार
आगीच्या ज्वालामुळे मुलाचा चेहरा भाजला ,धुरामुळे डोळ्यांना इजा ,दोन्ही डोळ्यांनी दिसणे बंद

मध्य प्रदेश : मांत्रिकाने सहा महिन्यांच्या मुलावर जीवघेणे उपचार केले. त्यामुळे त्या मुलाचे जीवनच धोक्यात आले आहे. त्या मांत्रिकाने सहा महिन्यांच्या मुलास आगीवर उलटे लटकवले. त्यामुळे मुलाचा चेहरा मोठ्या प्रमाणावर भाजला गेला. त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली. अंधविश्वासातून हा प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात घडलेल्या या प्रकरणात मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
असा घडला प्रकार
शिवपुरी जिल्ह्यातील खेरोना येथील आदेश वर्मा यांनी त्यांच्या सहा महिन्यांचा मुलगा मयंक याला त्याच्या मामांकडे दिघोदी येथे आला होता. त्या ठिकाणी त्याला ताप आला. त्यामुळे त्याची आई त्याला घेऊन मांत्रिकाकडे गेली. मांत्रिक रघुवीर धाकड याने त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला उलटे करत आगीच्या वरती ठेवले. आगीच्या ज्वालामुळे मुलाचा चेहरा भाजला गेला. धुरामुळे त्याच्या डोळ्यांना इजा झाली. त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसणे बंद झाले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मुलाची दृष्टी पुन्हा येणे अवघड असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
हेही वाचा – ‘जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बहुभाषिक व्हा’; कविता भोंगाळे
लोकांमध्ये जागृतीची गरज
नेत्रतज्ज्ञ डॉ. गिरीश चतुर्वेदी यांनीही यांनी सांगितले की, तंत्र-मंत्राला बळी पडून माता पित्यांनी असे करणे चुकीचे आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पालकांनाही आरोग्य सेवेचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एल.यादव यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त करत म्हटले की, अशा घटना टाळण्यासाठी समाजात जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. तंत्र-मंत्रासारख्या समजुती आजही आपल्या समाजात प्रचलित आहेत. ज्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे.
दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांना मांत्रिका रघुवीर धाकड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. शिवपूरचे पोलीस अधीक्षक अमन सिंह राठौड यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत मांत्रिकाला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.