‘पुणे बाजार समिती देशात अव्वल बनवा’; मंत्री जयकुमार रावल
पुणे : पुणे बाजार समितीचे काम आणि उत्पन्नही चांगले आहे. ही बाजार समिती राज्यातील नव्हे, देशातील एक नंबरची बाजार समिती बनवण्याचा संकल्प करा. केवळ संकल्प करू नका, तर तो पूर्णत्वास न्या, अशा सूचना पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी संचालक मंडळ आणि बाजार समिती प्रशासनाला दिल्या. याशिवाय बाजार समितीने शंभर दिवसांचे टार्गेट ठेवून अपुरी कामे तातडीने मार्गी लावावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी सभापती दिलीप काळभोर, उपसभापती दत्तात्रय पायगुडे, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, सिंदखेडा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, संचालक आणि बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी बाजार समितीच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. रावल म्हणाले की, पुणे शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर उपबाजार उभारण्यासाठी प्रयत्न करा. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पणन मंत्रालय तुमच्या पाठीशी आहे. त्या बाजारामध्ये जास्तीत जास्त सुविधा उभा राहण्यासाठी प्रयत्न करूया.
हेही वाचा – मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येकाने घटकाने योगदान द्यावे; मंत्री उदय सामंत
समिती मोठी असल्याने प्रश्न अनेक असतील. मीदेखील बाजार समितीचा संचालक म्हणून काम केले आहे. त्यामुळे बाजार समितीतील अडचणी मी जाणून आहे. त्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. प्रशासनाने सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून तत्काळ निर्णय घ्यावेत. त्यामुळे सगळ्यांना मदत होईल, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी बाजार समितीची सविस्तर माहिती सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी दिली आणि विविध मागण्यांचे निवेदनही रावल यांना देण्यात आले.