Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महावितरणच्या गो ग्रीनने गाठला दोन लाखांचा टप्पा

पुणे :  वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो ग्रीन योजनेअंतर्गत बिलासाठी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्यांच्या संख्‍येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याअंतर्गत पुणे प्रादेशिक विभागातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी आजअखेर तब्बल दोन लाखांचा टप्पा गाठला आहे.

पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील २ लाख ११३ वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करून या पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेमुळे या ग्राहकांना मिळून वार्षिक २ कोटी ४० लाख १३ हजार ५६० रुपयांचा फायदा होत आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत ५ लाख २४५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे ४० टक्के प्रतिसाद पुणे प्रादेशिक विभागात मिळाला असून, राज्यात महावितरणच्या १६ परिमंडलांमध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलामध्ये १ लाख ३४ हजार वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत.

हेही वाचा    –    ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ३ फरार आरोपींचा मर्डर झालाय’; अंजली दमानिया यांचा मोठा दावा 

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. या सवलतीमुळे अधिकाधिक नागरिक ग्रो ग्रीनला प्रतिसाद देत असून, अनेकांनी वेगवेगळ्या यूपीआय ऍपच्या माध्यमातून, तसेच बँकेच्याही ॲपवरून महिन्याचे वीजबिल भरण्यास सुरुवात केली आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ३६८ ग्राहक सहभागी झाले आहेत, त्यांचा १ कोटी ७२ लाख ४ हजार १६० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. सातारा जिल्ह्यातील १३ हजार १५३ ग्राहकांना १५ लाख ७८ हजार ३६० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार २३१ ग्राहकांना १७ लाख ७ हजार ७२० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १८ हजार ४५ ग्राहकांना २१ लाख ६५ हजार ४०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ११ हजार ३१६ ग्राहकांना १३ लाख ५७ हजार ९२० रुपयांचा वीजबिलांमध्ये वार्षिक फायदा होत आहे.

पर्यावरणात दिवसेंदिवस प्रतिकूल बदल होत आहे. त्यामुळे ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज झाली आहे. त्‍यामुळे वीजग्राहकांनी कागदी बिलांचा वापर बंद करून ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी व्हावे.

भुजंग खंदारे, महावितरणचे प्रादेशिक संचालक

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button