‘महाविकास आघाडी आंदोलन पुढे नेणार’; उद्धव ठाकरे
पुणे : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांनाही या निकालावर विश्वास नाही. वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते. त्यामुळे डॉ. बाबा आढाव यांचे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस हे पक्ष हे आंदोलन पुढे नेतील,’ अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मांडली.
“आजचा दिवस लक्षात राहणारा आहे. बाबा आढाव प्रेरणा देणारे कधी म्हातारे होऊ शकत नाहीत. योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला असून, या घोळात एक मोठा विषय ईव्हीएमचा आहे. माझे मत कोठे जाते, हे मतदारांना समजायला हवे. शेवटच्या एका तासात ७६ लाख मते का वाढली,’ असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?
दिल्लीतील बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट साताऱ्यातील दरे गाव गाठले. प्रकृती अस्वस्थ असल्याने ते गावी गेल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तिथे गेल्यापासून शिंदे नॉट रिचेबल आहेत. यावरूनही ठाकरे यांनी टीका केली. “राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांचे चेहरे पडले का आहेत? राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा-अर्चा करायला का जावे लागतेय ? त्यांनी राजभवनात जायला पाहिजे,’ असे ठाकरे यांनी नमूद केले.