पाईपला लटकलेल्या मृतदेहाचं धक्कादायक सत्य समोर, खुन्यांची ओळख पटताच पोलिसही हादरले
पुणे | पुण्यातील कात्रज परिसरात तीन दिवसांपूर्वी प्रकाश किसन जाधव (वय ४२) या व्यक्तीचा एका पाईपला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. मात्र, हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला तरी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली होती. या प्रकरणाचा आता छडा लागला असून पोलिसांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश जाधव हे कात्रज परिसरातील सुंधामाता नगर येथे पत्नी आणि अल्पवयीन मुलासोबत राहत होते. प्रकाश हे पत्नीवर सतत संशय घ्यायचे. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणं व्हायची. शुक्रवारी देखील त्यांच्यात भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात पत्नी आणि अल्पवयीन मुलाने गळा आवळून त्यांचा खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जवळच असणार्या एका पाईपला मृतदेह लटकवून आत्महत्या केल्याचा सापळा रचला.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नी आणि मुलाकडे विचारपूस केली असता या दोघांच्या माहितीत विसंगती आढळून आली. त्यानंतर पोलिसांचा धाक दाखवताच या दोघांनीही खून केल्याची कबुली दिली. आता भारती विद्यापीठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.