पिंपरी-चिंचवडकरांसाठी Good News : शहराला इतिहासात पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची संधी!
श्रीरंग बारणे यांच्यासाठी शुभसंकेत : श्रीकांत शिंदे, धर्यशील माने अशा तिघांना मंत्रीपदाची शक्यता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर एनडीएकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. पण तत्पूर्वीच मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळेल याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेनुसार, शिंदेंच्या शिवसेनेला तीन मंत्रीपदं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेला ७ जागा मिळाल्या आहेत. एनडीएत भाजप (२४०) तेलगू देसम पार्टी (१६), जनता दल युनायटेड (१२) या दोन पक्षांनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (७) जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं शिवसेनेला तीन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींची आज एनडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच येत्या ७ जून रोजी एनडीएच्या नेत्यांसह मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करावं लागेल.
तसंच दुसरीकडं इंडिया आघाडीच्या नेत्यांची देखील आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर इंडियाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “जनतेनं फॅसिस्ट सरकारच्या विरोधात कौल दिला आहे. लोकांची इच्छा आहे की हे सरकार जावं, योग्य वेळ आल्यावर आम्ही योग्य ती पावलं उचलू” तसंच त्यांनी समविचारी पक्षांना आणि अपक्ष खासदारांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं आहे.