पुणे विमानतळावर २६ कोटींचा ‘हायड्रोपोनिक’ गांजा जप्त; एका आरोपीला अटक

पुणे | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने मोठी कारवाई करत २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. विमानतळाच्या आवारातील एअर कार्गो विभागात ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
थायलंडहून पुण्यात आलेल्या आयात मालाच्या कंटेनरमध्ये चिनी खाद्यपदार्थ असल्याचे नमूद करण्यात आले होते. संबंधित कंटेनरवर ‘मँडरिन ऑरेंज सॉस’ नावाचा खाद्यपदार्थ असल्याची नोंद होती. हा माल थर्माकोलच्या खोक्यांमध्ये ठेवण्यात आला होता.
हेही वाचा : अहंकारात राहू नका, संघ असे १० पक्ष उभे करू शकतो; शरद पोंक्षेंचा भाजपला इशारा
कस्टमच्या पथकाकडून गुरुवारी (२६ मार्च) एअर कार्गो विभागात नियमित तपासणी सुरू असताना संबंधित मालाबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी थर्माकोलचे खोके उघडून तपासणी केली. तपासणीदरम्यान हवाबंद डब्यात पांढऱ्या रंगाची भुकटी आढळून आली.
डब्याची सखोल तपासणी केल्यानंतर पांढऱ्या भुकटीखाली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हायड्रोपोनिक गांजा लपवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संपूर्ण मालाची तपासणी करण्यात आली असता एकूण ७६ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे २६ कोटी ८० लाख रुपये किंमत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





