जीवाशी खेळ! पर्यटन बंदी झुगारून मावळात अतिउत्साही पर्यटकांची हजेरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-14-2-780x470.jpg)
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यात पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र अतिउत्साही पर्यटकांनी पर्यटनस्थळी हजेरी लावल्याचं दृश्य दिसून येत आहे. प्रशासनाच्या सुचनांना केराची टोपली दाखवत, हे पर्यटक स्वतःच्या जीवाशी खेळताना दिसून येत आहेत. गेली चार दिवस पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपून काढलं. अशात परिस्थिती कधीही हाताबाहेर जाऊ शकते, हे पाहून मावळ आणि मुळशी तालुक्यात 29 जुलैपर्यंत पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र हा बंदीचा आदेश झुगारून, आज शनिवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत अतिउत्साही पर्यटकांनी कुंडमळा इथं हजेरी लावली आहे.
प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी ही बंदी घातली आहे, याची कल्पना असताना हे असे काही पर्यटक अशा ठिकाणांना भेटी देताना दिसत आहेत. मग अशावेळी पाण्याच्या प्रवाहात कोणी अडकलं तर मग मात्र प्रशासनाला जबाबदार धरले जाते. परंतु तशी वेळचं येऊ नये, याची खबरदारी मात्र पर्यटक घेताना दिसत नाहीत. पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. भर पावसात अनेक पर्यटक हे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. मात्र, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे ही पुढील दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत. नागरिकांनी सहकार्य करून अशा धोकादायक स्थळी जाण्याचे टाळावे असे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
लोणावळ्यातील सहारा पूल, भुशी धरण, लाईन्स पॉईंट या परिसरामध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. या भागांत असणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले आहेत. या ठिकाणी जीवितहानी व धोका निर्माण होऊ नये याकरिता सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याशी लोणावळा पोलिसांनी चेक पोस्ट लावत सर्व पर्यटक वाहने व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मावळ प्रांताधिकारी यांनी 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.
पुण्यातील लोणावळा, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात प्रामुख्याने पर्यटन स्थळे आहेत. लोणावळा, ताम्हीणी घाट, पवना धरण, मुळशी धरण, खडकवासला या सारख्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, सध्या या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले असून खबरदारी म्हणून 48 तासांसाठी सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहे.