कोयली गावात आर्थिक साक्षरतेचा जागर; विद्यार्थ्यांना बचत व डिजिटल व्यवहारांचे मार्गदर्शन
एमआयटी महाविद्यालयाच्या उन्नत भारत अभियानांतर्गत उपक्रम; ६६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आळंदी (देवाची), पुणे : एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी (देवाची), पुणे यांच्या वतीने उन्नत भारत अभियान (UBA) अंतर्गत कोयली गावातील श्री भानोबा विद्यालय येथे आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिरीष शेलके यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता ८ वी व ९ वीतील एकूण ६६ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व, अंदाजपत्रक (बजेट) तयार करण्याची पद्धत, बँकिंग प्रणालीचे महत्त्व तसेच जबाबदारीने खर्च करण्याचे तत्त्व यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय बचत खाते, ठेवी, बँकिंग सेवा यांची माहिती देतानाच डिजिटल पेमेंट प्रणाली, कॅशलेस व्यवहारांचे फायदे आणि सुरक्षित आर्थिक व्यवहार याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
हेही वाचा – एमआयटी कॉलेज, आळंदी येथे एआय व इंडस्ट्री 4.0 साधनांवरील कार्यशाळा उत्साहात

चार्ट्स, प्रात्यक्षिक साहित्य आणि संवादात्मक अध्यापन पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना दैनंदिन आर्थिक व्यवस्थापनाची समज सुलभ करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच योग्य आर्थिक सवयी विकसित करण्यास चालना मिळाली. हा कार्यक्रम डॉ. हनुमंत शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. हनुमंत शिंगाडे (ग्राम समन्वयक – कोयली) आणि डॉ. श्रीराम करगांवकर (UBA समन्वयक) यांनी काम पाहिले. तसेच दिव्या हिवराळे, तुषार भोसले, आदित्य कड आणि वैभव बोऱ्हाटे या विद्यार्थी स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.
विद्यार्थ्यांच्या निर्णय क्षमतेला चालना…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहान वयातच आर्थिक साक्षरतेचे शिक्षण दिल्यास त्यांच्या भविष्यातील आर्थिक निर्णयक्षमता मजबूत होते, ज्यामुळे केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासालाही दीर्घकालीन चालना मिळू शकते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेची जाणीव वाढून जबाबदार आर्थिक वर्तनाची पायाभरणी झाली आहे. तसेच महाविद्यालय आणि ग्रामीण समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.





