अभियांत्रिकीची पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईने डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व अभियांत्रिकी पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांसाठी १२ भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे अभियांत्रिकी पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या सुमारे ६०० पाठ्यपुस्तके १२ प्रादेशिक भाषांमध्ये तयार करून अपलोड करण्यात आली आहेत. आता तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या पाठ्यपुस्तकांवर काम सुरू असल्याची माहिती एआयसीटीईकडून देण्यात आली.
भारतीय भाषांमधील ही पाठ्यपुस्तके एआयसीटीई मॉडेल अभ्यासक्रमानुसार डिझाइन केलेली आहेत आणि त्यात सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विज्ञान यासारख्या मुख्य अभियांत्रिकी शाखांचा समावेश आहे. या प्रादेशिक भाषांमध्ये मराठीसह हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश आहे.
अभियांत्रिकीच्या पदविका आणि पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या दोन वर्षांच्या पुस्तके तयार केली आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या पाठ्यपुस्तकांवर काम सुरू आहे. यापैकी आम्ही तिसऱ्या वर्षासाठी सुमारे ४० ते ५० पुस्तके तयार केली आहेत. या माध्यमातून कठीण अभियांत्रिकी अभ्यास मातृभाषेत सहज समजावून सांगितले जातील, अशी माहिती एआयसीटीईचे अध्यक्ष टी. जी. सीताराम यांनी दिली आहे.
हेही वाचा – मी फक्त घटक पक्षाचा आमदार, उपोषणाला बसायला मोकळा; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
ही पाठ्यपुस्तके आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना ती त्यांच्या मातृभाषेत सहज समजतील. प्रत्येक प्रकरणात उद्दिष्टे, परिणाम-आधारित शिक्षण घटक आणि समस्या सोडवण्यासाठी प्रश्न देण्यात आले आहेत. यामुळे अभ्यास साहित्याची निवड अधिक व्यवस्थित आणि ध्येय-आधारित होते. भाषांतर प्रक्रियेला गती देण्यासाठी एआयसीटीई आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरत असल्याचे एआयसीटीईने नमूद केले आहे.
प्रादेशिक भाषेतून शिक्षण बंधनकारक नाही
विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेत शिक्षण घेणे बंधनकारक नाही. हा फक्त एक पर्याय आहे, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत अभ्यास करणे अधिक सोयीस्कर वाटते त्यांच्यासाठी. ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी समजण्यास अडचण येते. यामुळे त्यांना विषय समजणे अधिक कठीण होते. मातृभाषेत शिक्षण घेतल्याने त्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजेल, असेही एआयसीटीईकडून स्पष्ट करण्यात आले.