पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रायव्हिंग स्कूल सुरु होणार
![Driving school will be started in Pune, Pimpri-Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/5ce3d6e73f26d.jpeg)
पुणे |महाईन्यूज|
शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोटार ड्रायव्हिंग स्कूल करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्येक मोटारीत एकच उमेदवार आणि एकच प्रशिक्षक असेल, असे बंधन घालण्यात आले आहे.
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे मोटार वाहन प्रशिक्षणाला बंदी घालण्यात आली होती; परंतु निर्बंध शिथिल झाल्यावर आता मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यासाठी पुणे आरटीओने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार, उपाध्यक्ष नीलेश गांगुर्डे, खजिनदार निखिल बोराडे यांनी स्वागत केले आहे. शहरात सुमारे ४०० मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहेत. त्यातील २५० स्कूल सध्या कार्यान्वित आहेत.
मोटार ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी देताना ‘आरटीओ’ने एका मोटारीत एकच उमेदवार आणि प्रशिक्षक असेल, असे बंधन घातले आहे. तसेच प्रत्येक फेरीनंतर मोटार सॅनिटाईज करावे लागेल. तर, प्रशिक्षक आणि उमेदवाराला मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच मोटारीतून फेरी सुरू करण्यासाठी प्रशिक्षक आणि उमेदवाराच्या शरीराच्या तापमानाची चाचणी घेणेही बंधनकारक करण्यात आले आहे.