‘दोन दिवसांत कामे करा, अन्यथा दहा कोटी दंड भरा’; अजित पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावले

पुणे : नुकत्याच झालेल्या पावसात हिंजवडी आयटी पार्कचे वॉटर पार्क झाल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी गंभीर दखल घेतली. हिंजवडीत पाणी साठणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी दोन दिवसांत कामे करा, नाहीतर दहा कोंटींचा दंड भरा, असा सज्जड दम पवार यांनी टाटा मेट्रो कंपनीला भरला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम टाटा कंपनी करत आहे. मेट्रोच्या कामामुळे हिंजवडीतील अनेक रस्त्यांवर पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण झाला आहे.
त्यामुळे, थोड्याशा पावसाने रस्त्यावर पाणी साचून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच्या घटनेमुळे हिंजवडी आयटी पार्क नाहीतर वाॅटरपार्क झाले असून याला राज्यशासन जबाबदार असल्याची खोचक टीका विरोधीपक्षांकडून केली जात आहे. ही बाब सरकारच्या जिव्हारी लागली आहे. मेट्रोचे काम करताना पावसाळी नाले बुजविणे, पाण्याला वाट करून देण्यासाठी सुविधा नसणे यामुळे थोडया पावसात रस्त्यावर पाण्याची तळी साचत आहेत. याबाबीकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी पुण्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी पालखी सोहळयाच्या नियोजनासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी सुरू; RSS आणि भाजपची नागपुरात समन्वय बैठक
पवार म्हणाले की, हिंजवडीत पाणी तुंबण्याच्या प्रकाराची माहिती पीएमआरडीए तसेच टाटा मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. या प्रकरणी मेट्रोने पाण्याला वाट करून देण्यासाठी तातडीनं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी, रविवारी या रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने या दोन दिवसात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सोमवार पर्यंत काम न केल्यास दहा कोटींचा दंड कंपनीला आकरण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनीने काम करताना अशा गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. मात्र, दुर्लक्ष झाल्यास आर्थिक दंडाचा बडगा उगारावा लागेल. असे झाले तर पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत.
पुढच्या आठवड्यात पालखी पुण्यात येत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचणाऱ्या भागात दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. दिवे घाटात पाणी व चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सध्या त्याठिकाणी काम सुरू आहे. मोठ्या पावसामुळे पाणी रस्त्यावर आले. पालखी घाटातून जाताना अनेक जण डोंगरावर बसतात.या डोंगरावरील खडक ठिसूळ असल्याने जागोजागी बॅरिकेट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवे घाट चढत असताना वारकऱ्यांना अडचण येणार नाही. घाटातील फ्लेक्स, जाहिरात फलक काढण्यास सांगितले असून, योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्याचे पवार यांनी सांगितले.