महापालिकेचा आज अमृतमहोत्सवी वर्धापनदिन

पुणे : शहराच्या नियोजनात्मक विकासाची जबाबदारी असलेल्या पुणे महापालिकेच्या स्थापनेस १५ फेब्रुवारी रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त महापालिका आपला अमृत महोत्सवी वर्धापनदिन साजरा करणार आहे. यासाठी सर्व माजी नगरसेवक, सेवानिवृत्त अधिकारी तसेच शहरातील सामाजिक, कला, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
प्रशासक तथा आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. हे या स्नेहमेळाव्यात सर्वांचे स्वागत करणार आहेत. दरम्यान, या स्नेह मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहेत. हे दोन्ही नेते उद्या सायंकाळी शिवाजीनगर येथील पोलीस मैदानातील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांनीही या कार्यक्रमात येण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा : ‘पीसीसीओई’च्या टीम क्रॅटोस रेसिंगचा फॉर्म्युला भारत-2025 मध्ये विक्रम!
प्रामुख्याने सायंकाळी ६ वाजता चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने सर्वांना निमंत्रण देण्यात येत आहे. १९५२ सालापासून महापालिकेत नगरसेवक कार्यरत होते. यातील बरेचसे लोक हयात नाहीत. मात्र, १९८६ सालापासून असणारे बरेच माजी नगरसेवक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्वांची यादी महापालिकेने तयार केली आहे.
या शिवाय वर्धापन दिनानिमित्त कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच, महापालिकेकडून अमृत महोत्सवाच्या संकल्पनेवर आधारित फळे, फुले आणि पुष्प प्रदर्शनही भरविण्यात आले आहे.