विविध योजना, लाभार्थी एकाच छत्राखाली

पुणे : राज्यातील सर्व सामाजिक महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एकसूत्रता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व संवर्गातील, स्तरातील लाभार्थींना एकच केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
राज्यातील विविध विभांगातर्गत अनेक सामाजिक महामंडळे कार्यरत आहेत. तसेच अनेक सामाजिक महामंडळे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व सामाजिक महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये लाभार्थींना एकच केंद्रीयकृत ऑनलाइन व्यासपीठ, पोर्टल असावे. अशा ऑनलइन केंद्रीकृत व्यासपीठ, पोर्टलचे स्वरुप निश्चित करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत विषयासंदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा – मनोरंजन विश्व: “गौरीशंकर’मधून उलगडणार प्रतिशोधाची अनोखी कथा
नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
या समितीत विषयाच्या आवश्यकतेनुसार इतर प्रशासकीय विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलाविण्यात येणार आहे.