#CoronaVirus: पुण्यातील बुधवार पेठेत कोरोनाची एन्ट्री, गर्भवतीसह पाच जणांना कोरोना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images-53.jpeg)
पुणे : पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या रेडलाईट एरियामध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शरीरविक्रय करणाऱ्या दोन महिला, तर तीन पुरुषांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासन यांचे नियोजन, देहविक्री करणाऱ्या महिलांनी पाळलेली स्वयंशिस्त यामुळे आतापर्यंत पुणे शहरातील रेड लाइट एरियात ‘कोविड19’चा संसर्ग झालेला नव्हता. गेले चार महिने या ठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.
बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय परिसरात असलेल्या दोन महिला आणि तीन पुरुषांची कोरोना चाचणी शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली आहे. काळजीची बाब म्हणजे पॉझिटिव्ह महिलांमध्ये चार महिन्यांच्या गर्भवतीचाही समावेश आहे. दोन्ही महिला वेश्या व्यवसाय करतात, तर पुरुष त्याच भागातील फेरीवाले असल्याची माहिती आहे. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर इथल्या महिलांच्या रोजगाराचा प्रश्नही सुटला होता. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने रेड लाईट एरिया पुन्हा सील होण्याची भीती महिलांना सतावत आहे.