TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

फटाका स्टाॅलच्या लिलावावेळी वादावादी

पुणे : महापालिकेच्या मोकळ्या जागांवर; तसेच खासगी मिळकतंमधील मोकळ्या जागा किंवा बंदिस्त जागांवर फटाका विक्री स्टाॅल्सला परवानगी देण्यासाठी आयोजित लिलावावेळी सभागृहाबाहेर वादावादी झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. महापालिकेतील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून वादावादी रोखली. दरम्यान, लिलावावेळी वादावादी झाली नाही. सभागृहाबाहेर काही काळ गोंधळ झाला, असा दावा महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

दिवाळीवेळी तात्पुरत्या स्वरूपात फटाका आणि शोभेची दारू विक्री करण्यासाठी परवाने मंजूर केले जातात. वर्तक उद्यानामागील नदीपात्रातील महापालिकेच्या मोकळ्या जागा फटाका विक्री स्टाॅल्ससाठी भाडे कराराने देण्यासाठी शुक्रवारी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून लिलाव करण्यात आला. यंदा ३५ स्टॉल भाड्याने देण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाने अर्ज मागविले होते. त्यासाठी ६६ जणांनी जागेसाठी अर्ज केले होते. प्रत्येक स्टॉलसाठी २३ हजार ५९५ इतके मूळ भाडे निश्चित करण्यात आले होते. लिलावावेळी जो जास्त बोली लावेल त्याला स्टाॅल्स देण्यात येणार असल्याने बोली लावण्यास व्यावसायिकांकडून सुरुवात झाली.

या दरम्यान, काही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना बोली लावण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातून जोरात वादावादी सुरू झाली. त्यामुळे महापालिका भवनात काही काळ गोंधळ उडाला. महापालिकेचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटविला. दरम्यान, लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडली. लिलाव प्रक्रियेतून महापालिकेला १४ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये एका स्टॉलसाठी सर्वाधिक १ लाख १० हजार रुपयांची बोली लागली आहे. दरम्यान, व्यावसायिकांमधील वाद सभागृहाच्या बाहेर झाला आहे, आतमध्ये कोणताही अनुचित प्रकार झाला नाही, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button