‘न्यू इंडिया बँकेतील घोटाळ्यात सर्व भाजपचे लोक’; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहार झाल्याने असंख्य सामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू असून बांधकाम व्यावसायिक धर्मेश जयंतीलाल पौन (५८) आणि मुख्य आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहता या दोघांना अटक करण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, की मुंबईत न्यू इंडिया बँक ज्याप्रकारे लुटली गेली त्यात सर्व भाजपाचे लोक आहेत. या बँकेत जनतेचा पैसा आहे. पण येथे सर्व बिल्डर आहेत, नेता, जैन आणि भाजपाचे कदम आहेत. आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल? शेकडो कोटींना बँक लुटली गेली. आता का बोलत नाहीत? भाजपाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही?
हेही वाचा : UPI युजर्ससाठी खुशखबर, ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या
जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली ही बँक आहे. आता ते (किरीट सोमय्या) ईडीकडे जात नाहीत. आता का पत्रकार परिषद घेत नाहीत? भाजपाचे आमदार त्यात अडकले आहेत. भाजपा आमदाराच्या दबावाखाली कर्जे वाटली गेली. भाजपाच्या गृहमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीसांनी यावर उत्तर दिलं पाहिजे. काय गुन्हे दाखल करत आहात तुम्ही? ज्यांना पैसे मिळाले आहेत ते सर्व सर्व बिल्डर भाजपाशी, आरएसएस संबंधित आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या देशात विरोधी पक्षातील लोकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय आहे, कोणता समान नागरी कायदा आणताय तुम्ही? असा सवाल त्यांनी केला.
काल पुन्हा एकदा अमृतसरला अमेरिकेच्या लष्कराचं विमान उतरलं. अफगाणिस्ताननंतर अमेरिकेचे लष्करी विमान उतरणारं भारत हा दुसरा देश आहे. शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या. काय करतंय भाजपा? हा त्यांना अपमान वाटत नाही. शीखांच्या पगड्या उतरवून त्यांना बेड्या घालून त्यांना इथे आणलं. नरेंद्र मोदी युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवू शकतात. पण आमच्या भारतीयांच्या पायात बेड्या अमेरिकेने घातल्या. ५६ इंचाची छाती घेऊन मोदी अमेरिकेत गेले, त्या छातीत टाचणी टोचली आणि ते इथे आले. तिसरं विमान अमेरिकेतून आलं, मग मोदींनी काय केलं? हिंदू कुंभच्या नावाखाली तुडवला जातो. दिल्लीचं रेल्वे प्लॅटफॉर्म असेल, नाहीतर प्रयागराज असेल, सरकार आहे कुठे? असंही संजय राऊत म्हणाले.