मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली, MPSC चे विद्यार्थी आक्रमक; ‘त्या’ एका निर्णयासाठी लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला

पुणे : पोलीस उपनिरिक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक उमेदवारांची संधी हिरावली जाणार आहे. त्यामुळे वयोमर्यादेच्या नियमांत शिथिलता आणावी अशी मागणी एमपीएससीच्या उमेदवारांकडून केली जात आहे. त्यानिमित्ताने त्यांनी आज पिंपरी चिंचवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी भेट नाकारल्याने उमेदवार नाराज झाले आहेत. विद्यार्थी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत, तरीही मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली जाते, अशी संतप्त प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आजपर्यंत याबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत विद्यार्थी म्हणाले, एमपीएससी पीएसआयची जाहिरात शासन धोरणामुळे सात महिने उशिरा आली. वयोमर्यादेमुळे काही विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. वय मर्यादा गणना १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत असून त्यांनी १ जानेवारी २०२५ पासून पकडावी, कित्येक विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. आम्ही सात महिने पाठपुरावा करतो आहेत. ७० ते ८० आमदारांचे पत्र मुख्यमंत्र्यांना गेले आहेत. ४ जानेवारी रोजी परीक्षा आहे. ४ लाख मुलं संभ्रमावस्थेत आहेत.”
हेही वाचा – मुंबईत पावणेदोन लाख घरे रिक्त! घरांच्या किमतीत आठ टक्के वाढ
“विद्यार्थी आत्महत्येच्या मानसिकतेत आहेत. वयोमर्यादेबाबत आज निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं, त्यानुसार आम्ही आजपर्यंत थांबलो. परंतु, अद्यापही काहीच निर्णय आलेला नाही. आम्ही कुठे जायचं? मुलांना काही झालं तर जबाबदारी कोण घेणार? मुलांनी आत्महत्या केल्यावर यांना जाग येणार आहे का? आमच्या संयमाचा अंत का पाहताय? असा संतप्त सवालही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.




