जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्याला पाच हजाराचा दंड
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातर्फे कारवाई

पुणे : कोथरूड येथे रस्त्यावर जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला महापालिकेने शोधून काढून पाच हजार रुपयांचा ऑनलाइन दंड भरण्यास भाग पाडले. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातर्फे ही कारवाई करण्यात आली.
आरोग्य निरीक्षक करण कुंभार व मुकादम वैजीनाथ गायकवाड हे कोथरूड भागात पाहणी करत असताना त्यांना कमिन्स कंपनीच्या मागील सार्वजनिक रस्त्यावर जैववैद्यकीय टाकल्याचे निदर्शनास आले. हा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याने या दोघांनी या कचऱ्यात काही माहिती मिळते का याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना त्यात एका कागदावर एका व्यक्तीचे नाव मोबाईल क्रमांक सापडला. त्यावर संपर्क साधून कचरा टाकल्याबद्दल चौकशी केली. या संबंधित व्यक्तीने कचरा टाकला असल्याचे मान्य केले. पण मी आता पुण्यात नाही, त्यामुळे दंड भरू शकणार नाही असे सांगितले.
हेही वाचा – ‘सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणे महत्त्वाचे’;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पण वैजीनाथ गायकवाड यांनी तुम्ही दंड भरणार नसाल तर आम्ही पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करू असा इशारा दिला. त्यानंतर मात्र कचरा टाकणाऱ्या या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पाच हजार रुपयांचा दंड भरला.
परिमंडळ उपायुक्त अविनाश सपकाळ, उपायुक्त संदीप कदम,सहाय्यक आयुक्त विजय नायकल, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली..