सावधान! पुण्यात जीबीएस रुग्णसंख्येने गाठला शंभरचा आकडा

पुणे : शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्येने शतक ओलांडले असून रविवारी १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ६२ रुग्ण पुणे ग्रामीण, १९ रुग्ण पुणे महापालिका, १४ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि ६ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. त्यामध्ये ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. यापैकी १६ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा
गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत असून त्यांच्यावरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती महागड्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालय आणि महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय येथेही उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.