विधानसभा निवडणूक : शिरुरमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’
महाविकास आघाडीत आग्रहाने घेतलेल्या सर्व जागांवर पराभव
मतदार संघात प्रभाव दिसलाच नाही; राजकीय समीकरणे बदलली
पुणे : महाविकास अघाडीचे ‘सेलिब्रेटी’ प्रचारक आणि खासादार डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘होमपीच’वर म्हणजे शिरुर लोकसभा मतदार संघातील सहाही मतदार संघात ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला आहे. हुकूमाचा एक्का म्हणून मिरवणारे खासदार कोल्हे स्वत:च्याच कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला एकही जागा मिळवू शकले नाहीत. त्यामुळे खासदारांचा प्रभाव शून्य झाला, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत घवघवीत मताधिक्य मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीला सहाही आमदार आपल्याच पक्षाचे असतील, असा आग्रह धरला. खासदारांच्या या भूमिकेच्या विरोधात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेते यांनी एकत्र येऊन जाहीर निषेध केला. त्यानंतर अगदी अखेरच्या क्षणी खेड-आळंदीची जागा मित्रपक्ष शिवसेनेला (उबाठा) सोडण्यात आली. ही खेडची जागा सोडली, तर मतदारसंघातील आग्रहाने घेतलेल्या सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दारुण पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. कोल्हे यांच्याविरोधात प्रचंड नाराजी असताना देखील केवळ शरद पवार यांच्या सहानुभूतीमुळे शिरूर लोकसभेतील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, हडपसर या पाच मतदारसंघांत मताधिक्य मिळाले. डॉ. कोल्हे यांच्या यशामध्ये शरद पवार यांच्या सहानुभूतीबरोबरच आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी मनापासून केलेल्या कामाचा मोठा वाटा आहे. यामुळेच महाविकास आघाडीला मिळालेल्या लोकसभेच्या यशानंतर विधानसभेसाठी शरद पवार गटासह मित्रपक्षांत मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढली.
हेही वाचा – आमदार महेश लांडगे यांच्या मंत्रीपदासाठी श्रीक्षेत्र भीमारंकराला साकडे!
हडपसर मतदार संघात चेतन तुपे यांनी अतितटीच्या लढतीमध्ये विजय मिळवला आहे. शरद सोनवने यांनी जुन्नमध्ये डॉ. कोल्हे यांचे निकटवर्ती सत्यशील शेरकर यांना पराभूत केले आहे. डॉ. कोल्हे यांच्याकरवी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेरकर यांचा काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेण्यात आला होता. आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांना १०० टक्के पाडा… असे आवाहन दस्तुरखुद्द शरद पवार यांनी केले. त्यानंतरही अवघ्या १ हजार ५२३ मतांनी दिलीप वळसे-पाटलांनी गड राखला आहे. शिरुरमध्ये ज्ञानेश्वर आबा कटके यांनी तब्बल ७४ हजार ५५० मतांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मावळते आमदार अशोक पवार यांचा पराभव केला आहे.
खेड- आळंदीत सेना जिंकली…
दरम्यान, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी खा. डॉ. कोल्हे यांनी राज्यासह शिरूर लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांत शिवस्वराज्य यात्रा काढून विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर शरद पवार गटाचा दावा सांगितला. शिरूर लोकसभेतील खेड-आळंदी, भोसरीमध्ये शिवसेना आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा तसा चांगला प्रभाव होता. परंतु, या सर्व जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह खा. कोल्हे यांनी धरला. याउलट खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे घवघवीत मताधिक्य घेत निवडून आले आहेत. भोसरीमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय झाला. जुन्नरमध्ये सेनेचा प्रभाव असतानाही डॉ. कोल्हे यांचा आडमुठेपणा आडवा आला, असे स्थानिक कार्यकर्ते खासगीमध्ये सांगतात.
भोसरीमध्ये सेनेच्या अपेक्षांवर पाणी…
तिकीट वाटपाच्या रस्सीखेचमध्ये चिंचवडमध्ये डॉ. कोल्हे यांचे परममित्र राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे शहरातील तीनही जागांवर ‘तुतारी’चे उमेदवार देण्यात आले. शिवसेना ठाकरे गटावर मोठा अन्याय झाला. भोसरीतून अजित गव्हाणे यांना उमेदवारी मिळाली. त्यासाठी खासदार कोल्हे यांनी रान पेटवले. महायुतीवर सडकून टीका केली. मात्र, कोल्हेंच्या आरोपांना भोसरीकरांना थारा दिला नाही. आमदार महेश लांडगे ६३ हजाराहून अधिक मतांनी निवडून आले. दुसरीकडे, भोसरीची जागा शिवसेनेला मिळणार हे निश्चित असतानाही डॉ. कोल्हे यांच्या आग्रहामुळे शिवसैनिकांना अपेक्षांवर पाणी सोडावे लागले. त्याचा रोषही कोल्हेंना सहन करावा लागणार आहे.
दुसरीकडे, चिंचवड मतदार संघात कोल्हे यांनी राहुल कलाटे यांना उमेदवारी खेचून आणली. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाना काटे यांना उमेवादरी निश्चित मानली जात होती. मात्र, कोल्हे यांनी कलाटेंसाठी ‘फिल्डिंग’ लावली. मात्र, या निवडणुकीत तब्बल १ लाखाहून अधिक मतांनी कलाटे यांना पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे कोल्हे यांची मोठी नामुष्की झाली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.