आमदार महेश लांडगे यांच्या मंत्रीपदासाठी श्रीक्षेत्र भिमाशंकराला साकडे!
माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, सागर हिंगणे यांच्याकडून श्रींना अभिषेक
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे मातब्बर नेते आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला. महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींमधील ही निवडणूक लांडगे यांनी तब्बल ६३ हजाराहून अधिक मतांनी जिंकली. सलग तीनवेळा पिंपरी-चिंचवडकरांचे प्रतिनिधी विधानसभा सभागृहात करणाऱ्या महेश लांडगे यांना आता ‘कॅबिनेट मंत्री’पदाची संधी मिळावी, असे साकडे त्यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक तथा फ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी श्रीक्षेत्र भिमाशंकराला घातले आहे.
देव-देश अन् धर्माभिमान यासह विकासाच्या मुद्यांवर आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा निवडणूक लढवली. ही निवडणूक महाविकास आघाडीकडून अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही जाहीर सभा भोसरीमध्ये घेण्यात आली. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी अत्यंत एकजूटीने ही निवडणूक लढवली आणि जिंकली.
हेही वाचा – एकनाथ शिंदे की अजितदादा? नव्या सरकारमध्ये कोण वरचढ?, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय?
निवडणूक निकालानंतर लांडगे समर्थकांनी जल्लोष केलाच, त्याचसोबत आपआपल्या श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी पूजा-प्रार्थना केली आहे. माजी नगरसेवक तथा फ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड , माजी स्वीकृत नगरसदस्य सागर हिंगणे, ब्रह्मा विष्णू महेश कबड्डी संघाचे अध्यक्ष संदीप शेलार, दिग्वीजय कामठे आणि राष्ट्रीय खेळाडू तुषार हजारे यांनी भीमाशंकर येथे महापूजा केली. श्रींना अभिषेक करण्यात आला आणि महेश लांडगे यांना ‘कॅबिनेट मंत्री’पद मिळावे, असे साकडे घालण्यात आले
देव-देश अन् धर्मासाठी कटिबद्ध…
निवडणुकीच्या पूर्वी आमदार लांडगे समर्थकांकडून मतदार संघातील २ लाख नागरिकांना पंचमूखी रुद्राक्ष वाटप करण्यात आले होते. तसेच, मतदार संघातील सुमारे २५ हजाराहून अधिक माता-भगिनींना श्रीक्षेत्र भिमाशंकर दर्शन यात्रा आयोजित केली होती. अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेली भव्य रामरथ यात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन महोत्सव, नवरात्रोत्सव सारख्या सण-उत्सवांमधून आमदार महेश लांडगे यांनी देव-देश अन् धर्माभिमान कायम ठेवल्याचे अधोरेखित होते.