जिल्ह्यात ३२ हजार घरकुलांना मंजुरी
पुणे : राज्य शासनाने यावर्षी पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला ३८ हजार ८२७ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून एका आठवड्यामध्ये ३२ हजार ११८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित घरकुल पुढील काही दिवसांत मंजूर करण्यात येणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकांना पक्के घर मिळण्यासाठी घरकुले मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या ही इंदापूर तालुक्यात ४,७०० एवढी आहे. तर जुन्नरमध्ये ४,१४४ एवढ्या लाभार्थींना घरकुले मंजूर झाली आहेत. बारामती ३,४०२ घरकुले तर सर्वात कमी मुळशी तालुक्यात ७३४ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. अद्याप ६,७०९ घरकुले मंजूर करणे शिल्लक आहे. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड दिले नसलेल्या नागरिकांचे अर्ज आहेत. शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत कामांना गती मिळाली आहे.
हेही वाचा – अजित पवारांपाठोपाठ चंद्रकांतदादा भेटले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली ही मागणी !
दरम्यान, मंजुरी शिल्लक असलेल्या नागरिकांनी आधार कार्ड बँकेला संलग्न करावेत. स्वतःची जागा उपलब्ध असल्याचे कागदपत्र ग्रामपंचायत किवा पंचायत समितीमध्ये द्यावीत. त्यानंतर तत्काळ घरकुल मंजूर केले जाईल. लाभार्थींनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पंतप्रधान आवास योजना टप्पा दोनमध्ये मंजूर केलेल्या लाभार्थींची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थींना माहिती समजण्यास मदत होईल. सध्या मंजुरी मिळालेल्या घरकुलांचे लाभार्थींनी बांधकाम सुरू करावेत.
– गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.