संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

पुणे : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास ७० दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.मात्र या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात यावी,या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव पार्क येथील वेस्टिन हॉटेलमध्ये २७वी पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अधिकारी उपस्थित आहेत.
त्याच दरम्यान पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर आणि रेखा कोंडे आले होते.मात्र त्यांना भेट नाकारण्यात आली.त्यामुळे सचिन आडेकर आणि रेखा कोंडे हे आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले.
हेही वाचा – राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल; प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत मंजुरीचे पत्र
बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी वाल्मिक कराड यांच्यासह अन्य आरोपींना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे.तसेच पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास केला जात नाही.तसेच यातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक करावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा,या मागणीसाठी आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होतो.
मात्र आम्हाला भेटू दिले नाही आणि आज आम्ही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना पोलिसांनी आम्हाला बोलू दिले नाही. आमचा आवाज दाबण्याच काम करण्यात आल आहे.त्यामुळे आम्ही याचा निषेध व्यक्त करीत असून येत्या काळात तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा सचिन आडेकर आणि रेखा कोंडे यांनी यावेळी दिला.