पुण्यात अपघात: मद्यधुंद कार चालकाने १२ जणांना उडवले; ३ ‘एमपीएससी विद्यार्थी’ गंभीर जखमी

पुणे : मद्यपी तरुणाने पार्क केलेल्या गाडीचा ताबा घेत कार नशेत दामटल्याने तब्बल १२ तरुण जखमी झाले आहेत. ही घटना नारायण पेठेत सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास एका चहाच्या स्टॉल जवळ घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कार चालक आणि त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे. जखमींमध्ये एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहेत.
यातील तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज(रविवार) गट क सेवा संयुक्त परीक्षा होत आहे. यामुळे जखमी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी चालक जयराम शिवाजी मुळे(२७, रा.बिबवेवाडी), दिगंबर शिंदे (२७) आणि राहुल गोसावी(२७) यांना ताब्यात घेतले आहे. तर जखमींमध्ये अविनाश दादासो फाळके ,प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे , मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे , गुलणाज सिराज अहमद यांचा समावेश आहे.
हेही वाचा – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतः हून; राजीनामा द्यावा : आमदार रोहित पवार
ही घटना भावे हायस्कूल जवळील श्रीनाथ साई नाथ अमृततुल्य येथे घडली. यातील तीघा गंभीर जखमींना संचेती रुग्णायलात, नऊ जखमींना मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोडक रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन आठ जणांना सोडण्यात आले. तर एका तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.