महापालिकेकडे 726 कोटी थकबाकी; टप्प्याटप्प्याने पाणी कमी करण्याचा जलसंपदा विभागाचा इशारा

पुणे : पुणे महापालिकडे मागील नऊ वर्षांपासून पाणीपट्टीची एकूण 726 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे आता ही पाणीपट्टीची वसुली करण्यासाठी जलसंपदा विभागाने पालिकेला येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत थकबाकी न भरल्यास पाणी टप्याटप्याने कमी करण्याची कारवाई करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.
2024-25 हे आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्याचा अवधी आहे. मार्चएंडमुळे जलसंपदा विभागाने महापालिकेकडे वसुलीचा तगादा लावला आहे. खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी 11.50 टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर केला आहे. 2018 मध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाणी वापराचे दर निश्चित केले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी जलसंपदा विभागाकडून 2022 पासून करण्यात येत आहे. महापालिकडे 2016 पासूनही ही थकबाकी असून, यामध्ये वाढ होत ती 726 कोटींवर पोहोचली आहे. या थकबाकी वसुलीची नोटीस खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी पाठवली आहे.
हेही वाचा – टोलच्या धोरणात राज्यशासनकडून सुधारणा फक्त ई टॅग किंवा फस्ट टॅग धरणार ग्राह्य
या थकबाकीबाबत महापालिकेचे म्हणणे आहे, की पाणी प्रदूषणाचा जो दंड आहे, तो माफ करण्यात यावा. त्याचबरोबर दोन टीएमसी पाण्याचा दर हा औद्योगिक वापराचा वापरला आहे. आम्ही औद्योगिक वापरासाठी पाणी वापरत नाही. त्यामुळे दोन टीएमसी पाण्याचा दर हा निवासी पद्धतीने करण्यात यावा.
जलसंपदा विभागाचे म्हणणे…
पाणीपट्टीची ही थकबाकी 2016 पासूनची आहे. या थकबाकीची वसुली करण्यासाठी खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या थकबाकीच्या निधीतून पगार, धरण सुरक्षा कामे, कालवा स्वच्छता आदी कामे करणे अपेक्षित आहे. मात्र, ही वसुली होत नसल्याने पाटबंधारे विभागाला विविध कामे करण्यात अडचणी येत आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा